अनाथासाठी एक हात मदतीचा - विद्यानिकेतन ॲकेडमीचा दिवाळीचा दीप समाजसेवेने उजळला !
श्रीरामपूर :( प्रतिनिधी) ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन अकॅडमीने आनंद व प्रकाश वाटण्याच्या सणात सामाजिक बांधिलकीची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही विद्यालयातर्फे “साई विठ्ठल अनाथ आश्रम” येथील बालकांसाठी “एक हात मदतीचा” हा अभिनव दिवाळी उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या लहानशा हातांनी तांदूळ, डाळी, साखर, तेल, बिस्किटे, साबण, टूथपेस्ट अशा जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या. या वस्तू फक्त किराणा नव्हत्या — त्या होत्या प्रेम, सहानुभूती आणि माणुसकीच्या दीपज्योती.
विद्यार्थ्यांच्या निरागस मनातील करूणामय भावनेने आश्रमातील मुलांचे आयुष्य उजळून निघाले. आश्रमाचे संस्थापक कृष्णानंद महाराज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अनाथ मुलांचे दुःख व व्यथा सांगून "आई- वडिलांचे छत्र लाभलेल्या तुम्हा भाग्यवंतानी आपल्या आई -वडिलांचा , थोरा - मोठ्यांचा आदर करावा". व सध्याच्या युगातील मुलांकडून मोबाइल अतिवापर या विषयी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः या अनाथ आश्रमातील बालचमूंशी संवाद साधून त्यांची दिनचर्या तसेच त्यांच्या भावना समजून घेतांना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.
विद्यानिकेतन संकुलाचे चेअरमन श्री. टि. ई. शेळके सर, व्हा. चेअरपर्सन डॉ. प्रेरणा शिंदे मॅडम आणि खजिनदार डॉ. राजीव शिंदे सर यांनी या उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले.
या स्तुत्य उपक्रमाची संकल्पना विद्यालयाच्या प्राचार्या वर्षा धामोरे मॅडम यांच्या दूरदृष्टीतून दरवर्षी साकार होते. विद्यार्थ्यांमध्ये करूणा , आत्मियता, समानुभाव जागृत करण्यासाठी यासारखे उपक्रम शाळेत राबवले जातात. समन्वयक अमित त्रिभुवन सर, पर्यवेक्षिका सपना भायभंग मॅडम, पर्यवेक्षक विजय रणदिवे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वीतेच्या शिखरावर नेला.अनाथांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणं हीच खरी दिवाळी!
असा संदेश देत विद्यानिकेतन ॲकेडमीने समाजात करुणा आणि संवेदनेचा सुवास पसरवला आहे. पंचक्रोशीत या उपक्रमाची प्रशंसा होत असून, अनेक सामाजिक संस्था व शाळा या उपक्रमातून प्रेरणा घेत आहेत.